info@skgroupcompany.com
7875556586
गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तीरीं भामानगर आहे, त्याच्या जवळच्या अरण्यांत आला. तेथें त्यास क्षुधेनें फारच व्याकुळ केलें. उदकसुद्धां कोठें मिळेना. परंतु तो तसाच फिरत असतां माणिक या नावांचा एक दहा वर्षें वयाचा शेतकर्याचा मुलगा, शेतांत काम करीत असतांना त्यानें पाहिला. ऐन दोनप्रहरीं तो भोजनास बसणार, इतक्यांत गोरक्षनाथानें तेथें जाऊन 'आदेश' केला. तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथाच्या पायां पडला आणि तुम्ही कोण, कोठें जातां, येथें आडमार्गांत कां आलेत, वगैरे विचारपूस मोठ्या आदरानें केली. तेव्हां गोरक्षनाथानें सांगितलें कीं, मी जति आहे; मला आतां तहान व भूक फार लागली असून जर कांहीं अन्न पाण्याची सोय होईल तर पाहा. हें ऐकतांच माणिक म्हणाला, महाराज! तयारी आहे भोजनास बसावें. असें म्हणून त्यानें त्यास जेवावयास वाढलें, पाणी पाजिलें व त्याची चांगली व्यवस्था ठेंविली. गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यावर त्यास समाधान वाटलें.
मग गोरक्षनाथानें प्रसन्न होऊन माणिक शेतकर्यास, तुझे नाव काय म्हणुन विचारलें. तेव्हां तो म्हणाला, आतां आपलें तर कार्य झालें ना ? आतां माझें नांव वगैरे विचारण्यांत काय अर्थ आहे? कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व विचारण्यांत करावयाची जरूर असते; पण आतां ही चौकशी निरुपयोगी ! आतां आपण हळूहळू आपली मजल काढा ! यावर गोरक्षनाथानें उत्तर दिलें कीं, तें म्हणतोस ती गोष्ट खरी; पण आज ऐनवेळीं तुं मला जेवावयास घातलेंस तेणेंकरून मी प्रसन्न झालों आहे; यास्तव तुझ्या मनांत कांही इच्छा असेल ती तूं माग; मी देतों. तेव्हां माणिक म्हणाला, महाराज आपण घरोघर अन्नासाठीं भिक्षा मागत फिरतां, असें असतां तुम्हांस माझ कळवळा आला असला तरी तुमच्याजवळ मला देण्याजोगें काय आहे ? हें ऐकून गोरक्षनाथानें सांगितल की, तूं जें मागशील तें मी देतों. तें माणिकास खरें न वाटून तो म्हणाला, तुम्ही भिक्षुक, मला काय देणार ? तुम्हांलाच कांहीं मागावयाचें असेल तर मागा, मी देतों. तें घेऊन आपण आपला रस्ता सुधारावा.
याप्रमाणें भाषण ऐकुन गोरक्षनाथानें विचार केला कीं, शेतकरी लोक अरण्यांत राहत असल्यानें त्यांना फारसें ज्ञान नसतें; यास्तव आपण याचें कांहीं तरी हित केलें पाहिजे. मग नाथ त्यास म्हणाला, अरे, मी सांगेन ती वस्तु देईन असें तुं म्हणतोस ! पण वेळ आली म्हणजे मागें सरशील. हें ऐकून माणिक वर्दळीवर येऊन म्हणाला, अरे, जो जीवावरहि उदार, तो पाहिजे तें देण्यास मागें पुढें पाहिल काय ? तुला वाटेल तें तूं माग. पाहा मी तुला देतों कीं नाहीं तें असें बरेंच भाषण झाल्यावर गोरक्षनाथानेंहि त्याची परीक्षा पहाण्याकरितां त्यास सांगितलें कीं, जी जी गोष्ट तुला करावीशी वाटेल किंवा ज्यावर तुझी इच्छा असेल, अशाच तुं तिरस्कार करावास, हेंच माझें तुझ्यापाशीं मागणें आहे. तें गोरक्षनाथाचें मागणें त्यानें आनंदानें कबूल केलें व नाथ तेथून पुढें निघून गेला.
नंतर माणिक आपलें आउतादि सामानाचें ओज्ञें डोक्यावर घेऊन शेतांतून घरीं निघाला व प्रथम जेवणाकडे त्याचें लक्ष गुंतलें इतक्यांत गोरक्षनाथ वचन दिल्याची त्यास आठवण झाली. मनांत येईल तें न करणें हाच वचन देण्यांत मुद्दा होता. मग त्याच्या मनांत आलें कीं, मन घरीं जाऊं इच्छीत आहे, त्याअर्थी वचनास गुंतल्याअन्वयें आतां घरीं जातां येत नाहीं. म्हणून तो तेथेंच उभा राहून झोंप घेऊं लागला. डोक्यावर बोचकें तसेंच होतें. मग अंग हलवावयास मन इच्छीत होतें, पण त्यानें अंग हालूं दिलें नाहीं. त्या वचनाचा परिणाम असा झाला कीं, वायुभक्षणा वांचून त्यास दुसरा मार्गच राहिला नाहीं. यामुळें कांहीं दिवसांनीं त्याचें शरीर कृश झालें. रक्त आटून गेलें; तिळभरसुद्धां मांस राहिलें नाहीं त्वचा व अस्थि एक होऊन गेल्या; असें झालें तरी तो रामानामस्मरण करीत एंका जागीं लाकडाप्रमाणें उभा राहिला. पुढे त्या माणिक शेतकऱ्याला अडभंगनाथ म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
Flat No 11, Rashmi House, 3rd Floor, Rajyog Society Road, Behind Masala veg-Noveg Restaurant, Vadgaon Khurd, Pune-41
support@skgroupcompany.com
+917875556586
+919850809495, 7620999595
© skgroupcompany. All Rights Reserved.